चक्र सुदर्शन | ChakraSudarshan | Dr Balaji Tambe
Profound introduction & preface to the book "चक्र सुदर्शन" (Chakra Sudarshan), where Dr. Balaji Tambe explores the scientific and spiritual significance of the seven chakras and their impact on physical, mental, and holistic well-being
MRP (Incl. of all taxes)
Development by DDSHOPAPPS
लेखक परिचय
डॉ. श्री बालाजी वासुदेव तांबे
आध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकार असलेल्या वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेव तांबेशास्त्री यांच्या घरात बडोदा येथे डॉ. श्री बालाजी तांबे यांचा जन्म झाला. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची रुची व गती उपजतच होती आणि घरातील वातावरण वेद, उपनिषदे, पुराणे, मंत्र-तंत्र यांच्या अभ्यासासाठी फारच अनुकूल होते. वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आध्यात्मिक अभ्यासाबरोबरच शालेय शिक्षणास सुरुवात करून त्यांनी अभियांत्रिकी व आयुर्वेदाचे पदवी शिक्षण पूर्ण केले. माता-पिता व सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांच्या आशीर्वादामुळे दृश्य जगताबरोबरच सूक्ष्म जगताचाही अभ्यास व अनुभव घेता आला. त्यातूनच पुढे भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, मंत्र-तंत्र, योग, ज्योतिष, संगीत यावर संशोधन करून त्यातील गूढार्थ समजून त्याचा जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी उपयोग केला.
१९६५ सालापासून ‘ॐ स्वरूपा’ या टोपणनावाने लेखन करून ध्यानयोग केंद्राची स्थापना केली व ‘सोम’ ध्यानयोग (Santulan Om Meditation yog - SOM Yog) ही ॐकार गुंजनाची दीक्षा देऊन अनेकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली. सध्या भारतात व परदेशात डॉ. श्री बालाजी तांबे यांची दीक्षा घेतलेला मोठा साधकवर्ग उपासना करत असतो. या सप्तरंगी ध्यानपद्धतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे सामाजिक सत्कृत्य सेवा आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना होय. डॉ. श्री बालाजी यांनी १९७२ पासून दर वर्षी आषाढ महिन्यात सात दिवसांचे आध्यात्मिक विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे शिबिर घेऊन अभ्यासक्रम चालविला.
‘सोम’ ध्यानयोग ही ध्यानपद्धती आणि ‘संतुलन क्रियायोग’ ही विशेष योगपद्धती श्री. बालाजी यांनी विकसित केली. आज भारतात व जगात अनेक साधक विविध केंद्रांवर या पद्धतींचा लाभ घेत आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञानाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, आयुर्वेद आणि इतर भारतीय विद्या यावर गेली ४० वर्षे श्री. बालाजी प्रवचने देत आहेत. आयुर्वेद प्रचार व उपचार याबरोबरच स्वास्थ्यसंगीताचे भारतात व भारताबाहेर कार्यक्रम करून त्यांनी अनेकांना स्वास्थ्य प्रदान केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सर्वंकष उपचार पद्धतीचे तंत्र डॉ. श्री बालाजी यांनी स्वतःच्या संशोधनाने व प्रयोगांनी पक्के केले आहे. आयुर्वेद आणि योगातील संयम डॉ. श्री बालाजी यांच्या रक्तात मुरलेला आहे.
आत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी ‘आत्मसंतुलन पद्धती’ त्यांनी सिद्ध केलेली आहे. ही पद्धती केवळ व्याधी दूर करत नाही, तर जीवनविषयक जाण व्यापक करते. यासाठी त्यांनी १९८२ साली कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या वैदिक गुरुकुल पद्धतीच्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. सध्याच्या तरुण पिढीला सुद्धा अवघड आध्यात्मिक विषय सोप्या भाषेत समजावण्याचा श्री. बालाजी यांचा हातखंडा आहे. आत्मसंतुलन व्हिलेज येथे आयुर्वेदातील वर्णनानुसार औषधांच्या निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी उभी केली. संगीत निव्वळ मनोरंजनासाठी नसून ती एक उपचारपद्धती आहे, असे त्यांचे मत आहे. त्यादृष्टीने त्यांनी स्वास्थ्यसंगीताच्या अनेक ध्वनिफिती तयार केल्या आहेत. निरामय शरीराबरोबरच जीवनविषयक जाण व्यापक करून मानसिक व आत्मिक आनंदाचे कारंजे त्यांनी अनेकांच्या जीवनात फुलवले.
भारत तसेच परदेशातील आघाडीची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये डॉ. श्री बालाजींचे योग, आयुर्वेद, फलज्योतिष, स्वास्थ्यसंगीत व अध्यात्म यावर लेख नियमितपणे प्रसिद्ध होतात. त्यांची आजपर्यंत ‘संतुलन क्रियायोग’ (इंग्रजी), ‘घरगुती आयुर्वेदिक उपचार’ (मराठी व इंग्रजी), ‘लिव्हिंग मेडिटेशन थ्रू ॐ स्वरूपा ध्यानयोग’ (चार भाग), रामायणाचा गूढार्थ समजवणारे ‘श्रीराम विश्वपंचायतन’, ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’, शरीरातील षट्चक्रांबद्दल माहिती देणारे ‘चक्र सुदर्शन’, आयुर्वेद उवाच (भाग १, २ व ३) श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा (भाग १ ते १०), Peacock Feathers (Part 1 & 2), वातव्याधी, स्त्रीआरोग्य, स्वास्थ्याचे २१ मंत्र (भाग १ व २), The Untold Secrets of Life - Purushasuktam (इंग्रजी व जर्मन) वगैरे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली अनेक वर्षे आत्मसंतुलन व्हिलेज येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एको’ मासिकाचे ते संपादक आहेत. दैनिक सकाळ या आघाडीच्या वृत्तपत्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘फॅमिली डॉक्टर’ या साप्ताहिक पुरवणीचे ते मुख्य सल्लागार आहेत. डॉ. श्री बालाजींनी ‘साम मराठी’ या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज ‘श्री गीतायोग-शोध ब्रह्मविद्येचा’ या कार्यक्रमात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांवर निरूपण केले. सध्या ‘नमो भारतम्’ या कार्यक्रमात समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि आयुर्वेद यावर निरूपण चालू आहे.
प्रस्तावना
विज्ञानाचा अभ्यास हे माझ्या आजवरच्या वाटचालीचे महत्त्वाचे अंग राहिलेले आहे. त्यामुळेच मी आधी अभियंता झालो आणि नंतर डॉक्टर. परंतु, विज्ञान हे केवळ भौतिक वस्तूंपुरते मर्यादित नाही. नीट समजून घेतले तर त्याहीपलीकडे असणारी त्याची व्याप्ती आपल्या लक्षात येते. शरीराचे जसे शास्त्र आहे, तसे अंतर्मनाचे, अंतर्चक्षूंचे, अनुभूतीचे - थोडक्यात अध्यात्माचेही एक क्षेत्र आहे. विज्ञानाबरोबरच मी अध्यात्माचाही अभ्यासक आहे. मुळातील विज्ञानाची आवड आणि त्यात मी अध्यात्माचा अभ्यासक यामुळे अध्यात्माचे काही विज्ञान आहे का, शतकानुशतके टिकलेल्या चिरकाल अशा अध्यात्माचे आणि माणसाचे असे कोणते वैज्ञानिक नाते आहे ज्यामुळे दोघांचा संबंध अधिकाधिक दृढ होत आहे, अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे हा माझ्या आजवरच्या वाटचालीचा एक भागच बनून गेला आहे. भारतीय स्वयंपाकाचे शास्त्र आणि भारतीयांचे आरोग्य यांचा निश्चित असा परस्परसंबंध आहे, तसाच निश्चित संबंध अध्यात्माचा आणि भारतीय लोकांचाही आहे. अध्यात्माची शास्त्रशुद्ध उपासना करणाऱ्या साधकाचे जीवन केव्हाही अधिक सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे होते. अष्टांगयोगाचा एक भाग म्हणून साधकांना परिचित असणारे षट्चक्र दर्शन हा ही व्यापक अर्थाने अध्यात्माचाच एक भाग. त्यामुळे त्याच्याकडे मी आकृष्ट होणे स्वाभाविकच होते. पुढे आयुर्वेद आणि अध्यात्माच्या प्रसारासाठीच्या माझ्या निरूपणांमध्ये षट्चक्रांचाही आपसूकच समावेश झाला. षट्चक्रे आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यांचा अत्यंत निकटचा संबंध असल्याने ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ पुरवणीत मी या षट्चक्रांवर एक मालिका लिहिली. अल्पावधीतच हा विषय लाखो लोकांपर्यंत पोचला. अनेकांना ही माहिती नवी होती, तर काहींना ती उद्बोधक वाटली. पत्र, फोन, निरोप किती आले याला तर गणतीच नाही. यातून हुरूप वाढल्यामुळे मग षट्चक्रांच्या माहितीसोबतच त्यांची व ॐकाराची साधना कशी करावी याबाबतही काही लेखन केले.
षट्चक्र हा विषय एकत्रित - म्हणजे ग्रंथरूपात हाती आला तर मणिकांचन योग होईल अशी भावना अनेक वाचकांनी व्यक्त केल्यामुळे त्या मालिकेत काही भर घालून, त्यावर संपादकीय संस्कार करून ‘चक्र सुदर्शन’ हा ग्रंथ सिद्ध झाला. माणसाचा विकास भौतिक साधनांवरून मोजला जातो, पण आत्मविकासाची त्याची तृष्णा शमते ती अध्यात्माच्या, षट्चक्र साधनेच्या मार्गावरून केलेल्या वाटचालीतूनच. मनुष्याचा परमोच्च आत्मविकास साधण्याच्या कार्यात आपलीही मदत व्हावी, हीच या लेखनामामागची प्रेरणा आहे...
पाचव्या वर्षी माझी मुंज झाली. त्यानंतर मी रोज १२ सूर्यनमस्कार घालू लागलो. वडिलांनी हळूहळू ही संख्या वाढवायला सुरुवात केली. सूर्यनमस्कार का घालायचे? त्याने काय होते? यासारखे प्रश्न मी त्या वेळी त्यांना विचारी आणि पटणाऱ्या, विज्ञानाचा आधार असणाऱ्या उत्तरांची अपेक्षा करी. वय वाढल्यानंतर प्रश्न वाढले आणि आकलनही. आकाशातल्या सूर्याला साक्षी ठेवून सूर्यचक्राची उपासना केलेली असली तरी आपल्या नाभीच्या ठिकाणी असलेल्या शरीरातील सूर्यालाही जागृत करण्याचा उद्देश आणि क्षमता त्यात आहे; शरीरातील सूर्यामुळे अन्नपचन होऊन शक्तीची निर्मिती होते, सामर्थ्य म्हणजे कर्म करण्यासाठी लागणारी शक्ती मिळते आणि ऊर्जेबद्दल आकर्षण वाढून विकासप्रक्रिया साधली जाते, हे वडिलांनी सांगितले आणि त्या वेळच्या क्षमतेनुसार मला थोडेफार समजलेही.
समज वाढल्यानंतर अथर्वशीर्षात असलेल्या ‘सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा’ या ऋचेचा अर्थ समजून घेताना मेंदूच्या मध्यभागी कल्पिलेल्या सूर्यचक्राची कल्पना लक्षात आली. सप्तशरीरे, सप्तरंग, सप्तस्वर, सप्ताकाश, सप्तलोक, आवर्त-विवर्तांतील साडेतीन गुणिले दोन अशा सात मात्रा या सर्वांची कल्पना आल्यानंतर शरीरस्थ चक्रांची संकल्पना अनुभवाला आली किंवा असे म्हणता येईल, की अनुभवानंतर या कल्पना विशेषरूपाने समजल्या. वेद, उपनिषद, आयुर्वेद, ज्योतिष, योग, संगीत यांच्या परस्परसंबंधातील साताचे गणित जगातील सात आश्चर्यांत समाविष्ट करावयास हवे असे वाटू लागले. पुढे पुढे मला भ्रूमध्यात दिसणाऱ्या प्रकाशाचा अनुभव येत असे.
पुण्यात १९६५ मध्ये मी अभ्यासवर्ग सुरू केले. त्यात सहभागी होणाऱ्या साधकांनाही योगासनांपेक्षा भगवद्गीतेच्या चिंतनात व भगवद्गीतेच्या चिंतनापेक्षा ॐकार गुंजनात अधिक रस असे. तरीही षट्चक्रभेदन, कुंडलिनी उत्थापन याविषयी अनेक जण औत्सुक्य दाखवत असत. कुंडलिनीबद्दल अधिक जाणून घेण्याची मलाही तेव्हा उत्सुकता होती. कुंडलिनीच्या अभ्यासाला योग्य मार्गदर्शन लाभावे असे वाटत असे. म्हणून मी श्री गुळवणी महाराजांच्या आश्रमात जाऊन कुंडलिनीचे रहस्य समजून घ्यावे असे ठरवून पूज्य महाराजांना तशी विनंती केली. त्यावर “हे रहस्य अनुभवानेच समजेल” असे त्यांनी सांगितले. माझे वडील वेदशास्त्रसंपन्न श्री वासुदेवशास्त्री तांबे आणि प. पू. गुळवणी महाराज हे दोघे प. पू. शक्तिपाताचार्य लोकनाथतीर्थ यांच्याकडे शिकत होते. या दोघांच्या गुरुबंधुसंबंधामुळे पूज्य महाराजांबरोबर अशा प्रकारची चर्चा करणे शक्य झाले. महाराजांनी सांगितल्यानुसार मी कुंडलिनीचे रहस्य समजून घेण्यासाठी अनुभवाची दारे आणखी उघडी केली. दीक्षा मिळाली किंवा कुंडलिनी जागृती झाली म्हणजे आता मोक्षात आपल्यासाठी जागेचे आरक्षण झाले असे नाही. अध्यात्मशाखेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला. यापुढे प्रत्येक चक्रावर काम केले, त्यांची उपासना केली व बरोबरीने दैनंदिन जीवन नैसर्गिकपणे जगले, आपल्या कर्मांचा त्याग न करता या दोन्ही गोष्टी करीत गेले तर साधकाला आपल्या लक्ष्यापर्यंत जाता येईल हेच खरे. या विषयांच्या चर्चा नेहमीच होत असत. आज्ञाचक्रात दिसणाऱ्या प्रकाशाची अनुभूती साधकाला फार लवकर होऊ शकते. कुंडलिनी जागृती झाल्यावर सर्व शरीर कंपायमान झाल्याचा अनुभव आल्यास तो केवळ कुंडलिनी जागृतीमुळेच आलेला अनुभव आहे असे सांगणे अवघड असते. (किंबहुना अशा कंपनांमुळे काही वेळेला संबंधित व्यक्तीला दैनंदिन जीवन जगणे अवघड होऊन बसते. त्यावर उपचार करताना वेगळ्या आयुर्वेदिक संकल्पनांचा विचार करावा लागतो.) सर्वात अडचणीचे ठरणारे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. येथे दलदल आहे असे मी म्हणत असे. पृथ्वीतत्त्वाचा जलतत्त्वाशी संपर्क आल्यावर त्या दलदलीतून बाहेर पडणे खूप अवघड असते. याच ठिकाणी मत्सर, काम वगैरे सर्व अडकवितात. यामुळेच जागृत झालेली शक्ती ऊर्ध्वगामी होऊन ब्रह्मरंध्राला जाण्याऐवजी मूलाधार चक्रात त्रास देऊ लागते व साधक अति कामसेवन किंवा अति भौतिकवादी होण्याचा धोका असतो. म्हणूनच कदाचित योगशास्त्राने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, स्वाध्याय, तप, शौच, संतोष, ईश्वर प्रणिधान यासारखे यम-नियम सुचविले असावेत.
या षट्चक्रांबाबत सर्वत्र नेहमीच आकर्षण असते, असे मला आढळून आले. १९८० नंतर परदेशात गेलो असता तेथे षट्चक्रदर्शनाची माहिती देणारी काही नवी पुस्तके पाहण्यात आली. लेडबिटर यांचे षट्चक्रांबद्दलचे पुस्तक मला माहिती होते पण, त्या वेळपर्यंत ते प्राचीनतेत जमा झाले होते. नव्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एका लेखकाला भेटण्याचा योग आला. त्याच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आले, की तो केवळ एक छायाचित्रकार असून त्याने केवळ ऐकीव माहितीवरून ही सर्व चित्रे तयार करून पुस्तक छापलेले आहे!
प्रकाश व ध्वनिसंगीत यांचा स्वास्थ्यासाठी उपयोग करताना शरीराचा व रोगांचा षट्चक्रांशी असलेला संबंध शोधला. सुवासाचा वा औषधांचा प्रत्येक षट्चक्रांशी असलेला संबंध शोधला आणि त्यावर अभ्यास करण्याचे ठरविले. त्यातून एक संकल्पना विकसित झाली. योगविद्या, तंत्र व मंत्र यांचा अभ्यास करीत असताना मंत्रांचा संगीताशी असलेला संबंध उमगला. त्याचप्रमाणे संगीत, योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष यांचा परस्परसंबंध लक्षात आला. या सर्वांचा संबंध षट्चक्रांशी असल्यामुळे त्यांचा संबंध प्रत्येक व्यक्तीशी वा त्याच्या शरीराशी आहे हेही लक्षात आले. त्यातून प्रकाश व संगीताच्या माध्यमातून स्वास्थ्य देता येईल ही कल्पना दृढ झाली. संशोधनानंतर तशा प्रकारची उपचारपद्धती विकसित केली. एकूण काय, तर या षट्चक्रांविषयी सर्वांच्या मनात असलेले आकर्षण, जीवनातील त्यांची उपयुक्तता किंवा त्याचा उपयोग करून घेऊन जीवन आरोग्यमय, आनंददायी कसे करता येईल या बाबतीत परमेश्वरी योजना लक्षात आली. त्यानंतर थोडक्यात पण शंकेचे निरसन होईल अशा तऱ्हेने षट्चक्रांसंबंधी माहिती साधकांसाठी उपलब्ध करून दिली. पण ती माहिती अत्यंत त्रोटक होती. त्यात चक्रे व त्या ठिकाणी असलेली शक्ती यांचे जर पूर्ण संतुलन झाले नाही तर कोणते शारीरिक व मानसिक दोष येऊ शकतात; त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे चक्र व त्या ठिकाणी असलेली शक्ती यांचे संतुलन झालेले आहे त्यांची शरीरे कशी आहेत, त्यांना काय फायदा होतो, त्यांच्या मानसिक धारणा कशा असतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे असते या विषयी माहिती प्रसिद्ध केली.
नंतर एक लक्षात आले की शरीराभोवती असलेल्या तेजोवलयाचा, ज्यावर षट्चक्रांचा प्रभाव असतो, अभ्यास केल्यास व्यक्तीच्या शरीरात घडणाऱ्या घटना, रोग वा त्याची मानसिक अवस्थाही समजू शकेल. यातूनच पुढे ‘ऑरा मशिन’ म्हणजे शरीराभोवती असलेल्या तेजोवलयाचा अभ्यास करणारे किंवा तेजोवलयाची आकृती व रंग दाखविणारे यंत्र इतरांच्या मदतीने तयार केले. पुढे युरोपमध्ये एका संस्थेने हे यंत्र बनवून विकण्यास सुरुवात केली. तेव्हा समाजात षट्चक्रांविषयी जागृती अधिकच वाढली. त्यानंतर अशा प्रकारची अनेक यंत्रे बाजारात आली. नंतर संपूर्ण शारीरिक, मानसिक, षट्चक्रांशी जवळीक दाखविणारे असे अप्रतिम यंत्र तयार केले व षट्चक्रांचा अभ्यास वाढावा अशी योजना केली. या सर्व योजनेतून आता तयार होत आहे ‘चक्र सुदर्शन’ हे पुस्तक.
हे पुस्तक तयार करताना अनेकांची मदत झाली. आत्मसंतुलन व्हिलेजमध्येच राहात असलेल्या कु. रत्ना हिने दिलेल्या सूचनांप्रमाणे चक्रांची चित्रे तयार करून दिली. अनुभूतीतून आकारलेली चक्रांसंबंधीची संकल्पना चित्रात उतरविण्याचे काम तिने चोखपणे केले. या पुस्तकाला लागणारी छायाचित्रे काढण्याचे आणि मुखपृष्ठ तयार करण्याचे काम माझा मुलगा चि. सुनील याने केले. तसेच फोटो डिजिटलराईझ करण्याचे काम श्री. नीरव मिस्त्री यांनी केले. विजया कोल्हे यांनी या पुस्तकाचे लेखन करण्यासाठी मदत केली. ‘सकाळ’मधील श्री. संजीव लाटकर व श्री. अभिजित मुळ्ये यांनी पुस्तकाच्या दृष्टीने अनेक सूचना करून मजकुराचे संपादनही केले. ‘सकाळ’चे आर्टिस्ट श्री. प्रभाकर भोसले आणि व्यवस्थापक श्री. हेमंत वंद्येकर यांनीही या पुस्तकाच्या घडणीत मोलाचा हातभार लावला. अशा तऱ्हेने अनेक जणांचे हात या रथचक्राला लागून हे चक्र फिरत पुस्तकरूपाने सर्वांपर्यंत पोचेल अशी शक्यता तयार झाली. या सर्वांचा मी आभारी आहे.
षट्चक्रांचा अभ्यास आणि साधना करण्याने आपल्यामध्ये किती चांगला आणि अनुकूल बदल घडतो, ही अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हा ग्रंथ माझ्याकडून लिहून घेण्यातही काही निश्चित अशी ईश्वरी योजना आहे, याविषयी मला खात्री आहे. आपणही याच श्रद्धेने हा ग्रंथ वाचावा, अशी विनंती आहे. ग्रंथ वाचताना आपल्याला काही प्रश्न पडले, काही शंका असल्या तर निःसंकोचपणे मला खालील पत्त्यावर टपालाने तसे पत्र पाठवा. षट्चक्रांसंबंधीची आणखी माहिती, उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिके, चक्रसंतुलनासाठी करावी लागणारी योगासने, आहार, जीवनातील शिस्त यांचा अंतर्भाव असणारा दुसरा भागही लवकरच प्रसिद्ध करण्याचा माझा संकल्प आहे. त्यात मी निवडक व महत्त्वाच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मनापासून करेन. धन्यवाद!
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१०४०५.